पिंपरी, (प्रतिनिधी) : शासनाच्या योजनेतून मिळणाऱ्या धान्यावर कब्जा करून त्यातून स्वत:चे तुणतुणे वाजविण्याचा भाजपा नेत्यांचा डाव उधळला गेला आहे. “करोना’सारख्या परिस्थितीतही लाजिरवाणा प्रकार करणाऱ्या आणि विरोधकांवर बेछूट, बेजबाबदार आणि चुकीचे आरोप करणाऱ्या सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दाखल करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केले आहे.
महापालिकेतील शिवसेना गटनेत्यांच्या दालनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. कलाटे म्हणाले, शासनाकडून मिळणाऱ्या रेशनिंग दुकानावरील धान्यावर कब्जा करण्याचा आणि हेच धान्य गरिबांना मोफत देत असल्याचा डाव भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी आखला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर भाजपाचे पितळ उघडे पडले. फुकटात स्वत:ची प्रसिद्धी करून गोरगरिबांचे दाते असल्याचा दाखविण्याचा भाजपा नेत्यांचा डाव होता. हा प्रकार उधळला गेल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांना दुःख झाल्याने ते बेछूट आरोप करीत आहेत.
आरोप नामदेव ढाके यांच्या माध्यमातून सुरू असले तरी ढाके यांचा बोलविता धनी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हे आहेत. त्यांनी स्वत: पुढे येऊन आरोप करावेत, असे आव्हानही कलाटे यांनी यावेळी दिले. गोर गरीब गरजूंना ज्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून धान्य दिले जाणार होते ते आता का गप्प बसले आहेत. त्यांनी स्वत: पुढाकार घ्यावा अथवा भाजपाने त्यांनी नावे व मोबाइल क्रमांक जाहीर करावेत जेणेकरून गरजू व्यक्ती त्यांच्याशी संपर्क साधून मदत मिळवितील. मात्र भाजपामध्ये ही धमक नाही “आयत्या बिळावर नागोबा’ अशी यांची नेहमीचीच पद्धत असून केवळ फुकटची प्रसिद्धी आणि इव्हेंट करणे ही त्यांची संस्कृती असल्याचेही कलाटे म्हणाले.
ज्या शिवसेना मतदारांच्या जीवावर आमदार झाले, त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. वरिष्ठांच्या चापलुसीमध्ये धन्यता मानणाऱ्यांनी शासनावर व आमच्यावर आरोप करण्याऐवजी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली ठेकेदारी थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दुसरा प्रकार
महापौरांना ग्लास फेकून मारल्याचा आरोप यापूर्वीही नामदेव ढाके व एकनाथ पवार यांनी केला होता. त्यावेळीच मी अब्रुनुकसानीचा दावा करणार होतो. मात्र पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी कार्यवाही केली नाही. मात्र या लोकांकडून जाणीवपूर्वक सातत्याने चुकीचे आरोप केले जात असल्याने आपण न्यायालयात दावा दाखल करून ढाके यांना जागा दाखविणार असल्याचेही राहुल कलाटे यावेळी म्हणाले.