पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रकोप होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर, रुपीनगर परिसरातील तब्बल 12 रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात पहिल्यांदाच एका दिवसात 12 जणांना करोनाची बाधा झाली आहे. यामुळे करोना बाधितांची संख्या 81 वर पोहोचली आहे. चिंता वाढविणारी बाब म्हणजे ओटास्कीम, निगडी येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्याही वाढून 4 वर पोहोचली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.काल (गुरुवारी) दिवसभरात दोघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज (शुक्रवारी) पुन्हा तब्बल 12 जणांना करोनाची बाधा झाली आहे. हे सर्व रुग्ण रुपीनगर आणि कोयनानगर परिसरातील आहेत. शहरात एकाच दिवशी 12 जणांना लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. शुक्रवारी सकाळी 12 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 81 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, 21 जण करोनामुक्त झाले असून, आत्तापर्यंत एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.
निगडी रुपीनगर परिसरातील एका 26 वर्षीय तरुण करोनाबाधित असल्याचा अहवाल गुरुवारी (दि. 23) प्राप्त झाला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 25 जणांना महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामधील 12 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. आज बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये सात पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एकजण गुरुवारी बाधित झाला होता. आज बाधितांमध्ये तीन वर्षीय दोन मुलींचा समावेश आहे. तर 20 वर्षे, 26 आणि 28 वर्षीय तीन महिलांचा समावेश आहे. पुरुषांपैकी एकाचे वय 60 वर्षे असून इतर 18 ते 35 या वयोगटातील आहेत.
लहान मुले, महिलांची संख्या वाढली
शहरातील करोनाबाधित महिला आणि लहान मुला, मुलींची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे समोर येत आहे. आज बाधित 12 रुग्णांपैकी तीन वर्षे वयाच्या दोन मुली असून, 20 ते 28 वयोगटीतील तीन महिलांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी पाच व सात वर्षांच्या बालकांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे आज पुन्हा भर पडल्याने महिला व बालकांना करोनाचा धोका वाढला आहे. तर बालकांमध्ये वाढत असलेल्या संसर्गामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच शहरातील एकूण रुग्णांचे आकडे पाहता त्यात सर्वाधिक संख्या तरुणांची आहे.
एका रुग्णाचा मृत्यू
शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण नगण्य होते, ही जमेची बाजू समजली जात होती. परंतु आता मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान करोनामुळे आणखी एका 65 वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील करोना बळींची संख्या चारवर गेली आहे. त्यापैकी तीन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील आहेत. तर एक मृत्यू झालेली व्यक्ती पुण्यातील गुलटेकडी परिसरातील आहे. तर निगडी परिसरातील बळींची संख्या दोनवर गेली आहे.