पुणे :शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, मार्गात अडथळा ठरणाऱ्या तसेच नियोजन चुकल्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अपयशी ठरलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडायचा, की आहे त्या पुलाच्या रचनेत बदल करायचा? या बाबतचा निर्णय शनिवारी होणार आहे.
या निर्णयासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक होणार आहे. हा निर्णय घेण्यासाठी पीएमआरडीएकडून बैठक घेण्याची मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली होती.
या चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने 15 वर्षांपूर्वी हा पूल उभारला आहे. मात्र, या पुलाचा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोणताही फायदा झालेला नाही.
परिणामी, या पुलामुळे या चौकातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडली असून, या रस्त्यावर असलेल्या महापालिकेच्या बीआरटी प्रकल्पास तसेच शिवाजीनगर ते हिंजवडी प्रस्तावित मेट्रो मार्गातही हा पूल अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडावा लागणार आहे. त्यानुसार पीएमआरडीए प्राधिकरणाने याबाबत पालकमंत्र्यांना निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यावर शनिवारी पवार यांनी बैठक बोलविली आहे. पुण्यातील सर्व खासदार, आमदार तसेच महापालिकेचे पदाधिकारी सहभागी होणार असून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे.